मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्याने निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांचा हल्ला.

Shivsainik beating ex navvy officer

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्स ऍप ग्रूप वर फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांनी एका ६२ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची गंभीर घटना कांदीवलीतील समतानगर भागात घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

कांदीवलीतील समतानगर येथे लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास काही शिवसैनिकांनी हा हल्ला केला. मदन शर्मा या निवृत्त अधिकाऱ्यावर हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मदन शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून ६ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२५ (गंभीर इजा पोहचवणे ) अन्वये तसेच दंगलीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली असल्याचे ट्विट भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम व अन्य तिघांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जखमी मदन शर्मा यांचा फोटो ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाब विचारला आहे. ‘ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. केवळ एक व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला गुंडांनी मारहाण केली आहे. हे गुंडाराज थांबवा. या गुंडांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी’, अशी मागणी फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *