वैनगंगेच्या पुराचा ब्रम्हपुरी तालुक्यातील २५ गावांना फटका , चंद्रपूर गडचिरोली भंडारा जिल्ह्यांत पूर स्थिती

Vainganga Floods update in vidarbha

गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने व चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस पडल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे आणि या पुराचा फटका ब्रम्हपुरी तालुक्यातील २५ गावांना बसला.

लाडज या गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढले आहे. दरम्यान, चार बचाव पथकाने या गावातील २०० लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. तर शेकडो लोक अजूनही अडकून पडले आहेत. बचावकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हेलिकॉप्टर मागवलं मात्र सर्वदूर पाणी असल्याने व उतरण्यास जागा नसल्याने ते परत निघून गेलं. दरम्यान, सोमवारी सकाळी पुन्हा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य राबविण्यात येणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने वैनगंगा लगतच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. गोसेखुर्द धरणातून तब्बल २२ हजार ७८२ क्‍यूमेक्‍स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदी, नाल्या फुगत पुराची भीती निर्माण होईल. या पार्श्‍वभूमीवर नदी, नाल्यांच्या काठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने आधीच सतर्कतेचा इशारा दिला होता.

निवासी उपजिल्हाधिकारी गव्हाड यांच्या माहितीनुसार, “आता हे हेलिकॉप्टर सोमवारी सकाळी बचाव कार्यासाठी पुन्हा येणार आहे. लाडज येथे अजूनही शेकडो लोक अडकून पडले आहेत. बचाव पथकाव्दारे बेटाला, रानमोचन गाव व परिसरातील राईस मिल, पोल्ट्री फॉर्म येथे अडकलेले ४० ते ५० मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर २ बोटींमार्फत लोकांना पिंपळगाव येथे पाठवण्यात आले आहे. तसेच बेळगाव, अहेर नवरगांव, चिखलगाव, पिंपळगाव व इतर छोट्या गावातून बोटीने १३५० लोकांना सुरक्षितस्थळी पोहचविण्यात आले.

गोसेखुर्द धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने याचा फटका भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्याला बसला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात पाणी शिरले आहे. मुख्य बाजारपेठ समजली जाणारी बाजारवाडी एका नदीच्या रुपात स्थांलनतर झाली आहे. हजारो शेकऱ्यांची पीकं नष्ट झाली, तर लाखो रुपयांचा भाजीपाला व्यापाऱ्यांनी पुराच्या पाण्यात सोडला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, दिना, कठाणी या नद्यांना पूर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दहा मार्ग बंद असून देसाईगंज आणि आरमोरी या दोन तालुक्यातून ३६० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *