चंद्रपुरातील महिला बचत गटांचे उत्पादने आता मिळणार अमेझॉनवर

Chandrapurs women self group products available on Amazon

चंद्रपूर जिल्ह्यातील बचत गटातर्फे तयार करण्यात येणारे उत्पादने आता अमेझॉन वर मिळणार आहे. गावपातळीवर आपल्या गुणकौशल्यातून विविध नाविण्यपुर्ण उत्पादने निर्माण करणाऱ्या उमेद स्वयंसहायता समुहांना जागतिक बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने जिल्हयाने एक महत्वाचे पाउल टाकले असून जिल्हातील उमेद समुहांची उत्पादने आता ॲमेझान या ई कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध झाली आहेत. 

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते औपचारिकरित्या या उत्पादनांना वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले. 

सदयस्थितीत जिल्हयात सुमारे ७२०० समुह असून या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर ८६० ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहे, तर ३४ प्रभागसंघ तयार झाले आहेत. अभियानाच्या माध्यमातून सुमारे १ लाख ८० हजार कुटूंबे आपल्या विविध आर्थिक गरजा भागवत आहेत. जिल्हयात विविध समुह अनेक उत्पादने तयार करीत आहेत. यात कलाकुसरीच्या वस्तू , खादय उत्पादने, काष्ठ शिल्प, वनऔषधी आदीचा समावेश आहे. सध्या या वस्तू जिल्हा व राज्य पातळीवरील प्रदर्शने तसेच स्थानिक स्तरावर विकल्या जात आहेत. आता या उत्पादनांना जागतिक दर्जाच्या ई कॉमर्स वेबसाईट ॲमेझान वर स्थान मिळाले आहे. 

आज नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या सह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, विसापूर येथील सुरभी, झाशी राणी व जागृती या स्वयंसहायता समुहातील महिलांना ॲमेझान उत्पादनाचे पत्र देण्यात आले तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. वडेट्टीवार यांनी महिलांचे कौतुक करीत सदर वस्तू आता भारतभरातील ग्राहक खरेदी करतील आणि या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *