शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांचा राजीनामा, परभणीतील शिवसेना व राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर

राज्यात सत्तेमध्ये सोबत असणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील वाद पुन्हा समोर आला असून याच वादामुळे शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपण खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राजीनाम्यामागे त्यांनी राष्ट्रवादीचं स्थानिक राजकारण कारणीभूत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण

परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागच्यावेळी राष्ट्रवादीचं प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते. त्यावेळी पुढच्यावेळी आपल्याला संधी मिळेल असं सांगून शिवसैनिकांना समजावण्याचा आलं परंतु, आता पुन्हा जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचंच प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणामुळे शिवसेनेची गळचेपी होत असल्यानेच शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी राजीनामा दिला.

मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. राष्ट्रवादीचा आमदार नसताना त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेची पदं मिळतात. पण शिवसैनिकांना न्याय मिळत नाही. शिवसैनिकांना मला जर न्याय मिळवून देता येत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची?, असा सवालही त्यांनी केला. बाजार समितीवर राष्ट्रवादीचं प्रशाकीय मंडळ दुसऱ्यांदा नियुक्त करण्यात आल्याचं मला शल्य आहे, त्यामुळे मी राजीनामा देत असून शिवसैनिकांना न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *