उद्यापासून राज्यातील आंतरजिल्हा बससेवा होणार सुरू – परिवहमंत्री अनिल परब

कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली बससेवा उद्यापासून सुरु होणार असल्याची माहिती परिवहमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. राज्यात उद्यापासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं आवश्यक आहे.

कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु, आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.

याआधी परिवहन विभागाने मे महिन्यात आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु “लोकांच्या मनात जबरदस्त भीती आहे. रेड झोनमधून इतर जिल्ह्यामध्ये माणसं पाठवू नका, कोरोना पसरवू नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. काही लोकांनी विरोध केला, त्यामुळे आम्ही ताबडतोब आंतरजिल्हा एसटीचा निर्णय स्थगित केला,” असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं. लॉकडाऊनमुळे ११३ दिवसाच्या कालावधीत एसटीच्या इतिहासात प्रथमच २३०० कोटींचा महसूल बुडाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *