आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन.

Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. कोरोनाशी मैदानात लढा देणारे राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनामुळे टोपे कुटुंबीयांसह राष्ट्रवादीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (२ ऑगस्ट) संध्याकाळी ४ वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले. कोरोना वॉरियर पोरका झाला, अशा शब्दात अनेकांनी राजेश टोपेंच्या आईला श्रद्धांजली वाहिली.

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला रुग्णालयात जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरुवात ते करायचे. ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. 4 वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशिर्वाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *