शेतकऱ्यांनो कीटकनाशके फवारणी करतांना काळजी घ्या, चंद्रपूर कृषी विभागाचे आवाहन.

Chandrapur agriculture department appeal to take care during spraying

शेतकऱ्यांनी पिकांवर कीटकनाशके फवारणी करतांना काळजी घ्यावी. किटकनाशकाची फवारणी करतांना सर्व शेतकरी (भुधारक,शेतमालक) व शेतमजूर यांनी प्रतिबंधात्मक किटचा म्हणजेच चष्मा, संरक्षक कपडे, बुट हातमोजे नाकावरील मास्क इत्यादीचा वापर कटाक्षाने करावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

किटकनाशकांची फवारणी शेतमजुरांमार्फत केली जात असताना शेतमजुरांना संरक्षक किट पुरवून, त्यांना आवश्यक त्या सूचना देण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी शेतमालकाची आहे. त्यानुषंगाने शेतमालकाने नैतिक व कायदेशीर जबाबदारी पूर्ण पाडावी, जेणेकरून, संभाव्य शारिरीक व जिवित हानी टाळता येईल.

पिकावर किटकनाशकांची फवारणी करतांना शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसतांना करावी. कारण उष्ण दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिणण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. फवारणी करतांना त्या व्यक्तीने वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करून फवारणी करावी. पिकावर किटकनाशकांची फवारणी करतांना जवळपास अन्य व्यक्ती अथवा जनावरे यांची उपस्थिती असणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी.

किटकनाशके वापरण्यापुर्वी लेबल व माहिती पत्रक वाचुन खबरदारीच्या सर्व सुचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली किटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तींना समजण्यासाठी असतात म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कमीत कमी विषारी असतात. तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही किटकनाशके फवारणीसाठी वापरू नये.

फवारणी पुर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ नये अथवा पिऊ नये. फवारणी नंतर साबणाने स्वच्छ आंघोळ करावी. शेतमजूराला संरक्षक किट व साबण पुरविण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी शेतमालकाची आहे. फवारणीसाठी स्वच्छ पाणी बंधनकारक आहे.

फवारणी केल्यानंतर घ्यायची काळजी

किटकनाशके पोटात गेल्यास किंवा त्वचा, डोळे, श्वसन इंद्रियव्दारे विषबाधा होऊ शकते. व्यक्तीस विषबाधा झाल्यास अपघात स्थळावरून दुर न्यावे त्याचे अंगावरील कपडे बदलावे. रोग्याचे अंग, बाधीत अवयव ताबडतोब साबन लावुन स्वच्छ पाण्याने व कोरड्या टॉवेलने पुसावे.किटकनाशक पोटात गेले असल्यास रोग्याला ताबडतोब ओकारी करण्यासाठी उपाययोजना करावी.

जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे. रोग्याना थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून घ्यावे. रोग्याचा श्वासोच्छावास नियमीत किंवा बंद झाल्यास रोग्याला तोंडाला तोंड लावुन कृत्रीम श्वासोच्छावास सुरू करावा. रुग्णाला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मवु कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.रोगी बेशुध्द पडल्यास त्याला शुध्दीवर आणावयाचे प्रयत्न करावे.रोगी बेशुध्द पडल्यास त्याला काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये. रोग्यास त्वरीत किटकनाशकाच्या माहिती पत्रकासह डॉक्टरकडे दाखवावे किंवा दवाखान्यात दाखल करावे. व डॉक्टरांचे निगरानित उपचार करावे. रोगी बरा झाल्यास त्याची संपुर्ण वैदयकिय तपासणी करून घ्यावी.

शेतमालकाने, माणूसकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहिती, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी अथवा पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्याला अथवा तहसिलदार यांना अथवा पोलिस ठाणे अंमलदारास अथवा आरोग्य अधिकाऱ्याला अथवा जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकाऱ्याला अथवा जिल्हा शल्यचिकित्सक यांना कळवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *