भूमिपूजनासाठी अयोध्या सज्ज, राम जन्मापासून ते लंका दहनपर्यंत सर्व प्रसंग भिंतीवर

Ram Mandir special report in ayodhya

संपूर्ण देशाचे लक्ष अयोध्येकडे लागलेले आहे. राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख जवळ येत असून भूमीपूजनासाठी संपूर्ण अयोध्या सज्ज आहे. अयोध्येची प्रत्येक गल्ली, प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक भिंत सजून-धजून सज्ज होते. रामाच्या जन्मापासून ते लंका दहनापर्यंतचे सर्व प्रसंग अयोध्येच्या भिंतीवर रेखाटले गेले आहेत. ज्या अयोध्येनं मागच्या अनेक दशकांपासून राममंदिराचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाची मुहूर्तमेढ पुढच्या काही दिवसातच रोवली जाणार आहे.

भूमिपूजनसोबतच मंदिराच्या निर्माणच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं आहे. ज्या दगडावर रामाचं नाव कोरलं जातं आहे, तो दगडसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुढच्या शेकडो वर्षांपर्यंत राम मंदिराची भव्य-दिव्यता कायम राहावी, म्हणून निर्माणासाठीचे असंख्य घटक मोठ्या विचाराअंती निवडले गेले आहेत.

भारतपूरच्या पहाडपूरमधून हे दगड अयोध्येत पोहोचत आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हजारो वर्षांपर्यंत सुद्धा या दगडांची चमक कणभरही कमी होत नाही. त्याउलट या दगडावर जर पावसाचं पाणी पडत राहिलं, तर त्याची चमक दिवसेंदिवस वाढत जाते
अयोध्येचं मंदिर पहाडपूरच्या दगडांनी उभं राहत असल्यामुळे त्याच पहाडपूर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना अभिमान वाटतो आहे. ऐतिहासिक मंदिराच्या निर्माणासाठी ज्यांच्या हातांनी पहाडपूरचे हे दगड आकार घेतायत, त्या कारागिरांच्या चेहऱ्यावरही अनोखा आनंद झळकताना पाहायला मिळत आहे.

नव्वदच्या दशकात जेव्हा राममंदिर निर्माणाचं आंदोलन सुरु होतं, तेव्हा सुद्धा पहाडपूर चर्चेत होतं. कारण, त्यावेळी सुद्धा रामाचं नाव कोरलेल्या विटा पहाडपूरमधूनच आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सध्या पहाडपूरमधून दगड आणण्याचा कामाला वेग आला आहे. अनेक निष्णात कामगार मागच्या अनेक दिवसांपासून अयोध्येत दाखल होत आहेत.

येत्या 5 ऑगस्टला भूमीपूजनानंतर अयोध्येत राममंदिर निर्माणाचा यज्ञ सुरु होणार आहे. त्या यज्ञातून कारागिरांचे हे हात पुढचे साडे तीन वर्ष देदिप्यमान कलाकृती साकारणार आहेत. त्याच कलाकृतीत प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिष्ठापणा होईल. तीच मूर्ति पुढच्या अनेक पिढ्यांच्या मनावर कायमची कोरली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *