आगामी निवडणुकीसाठी भाजपाचा स्वबळावर लढण्याचा निर्धार

Bjp will participate saperate in upcoming election

महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापन केल्याने आता भाजपाने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. जास्त जागा असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यामुळे भाजपच्या कार्यकारिणीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत भाजप कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, असा पवित्राच भाजपने घेतला आहे.

यापुढे राज्यात निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. एकेकाळी २५ वर्ष सोबत होता त्या शिवसेनेसोबत युतीची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आगामी काळात जर राजकीय परिस्थिती बदलली तरी शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मध्यंतरीच्या काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर अचानकपणे मनसेनं मेकओव्हर करत हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येतील अशी राजकीय चर्चा उघडपणे रंगली होती. पण, आता भाजपने मनसेसारख्या पक्षासोबत सुद्धा युती न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी भाजप पक्षाच्या कार्यकारिणीला सुरुवात झाली होती. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्य भाजपला स्वबळावर सत्ता आणण्याचं आवाहन केलं होतं. ‘महाराष्ट्रात  स्वार्थाकरता एकत्र येऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे  सरकार आहे. या सरकारनं कोरोना परिस्थितीमध्येही भ्रष्टाचार केला आहे. त्यांचे कारनामे हे  लोकांसमोर आणले पाहिजे. मुळात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्था करता एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे. येणाऱ्या काळात कुणाचाही मदत न घेता सत्तेत येण्यासाठी तयारी करा’ असा आदेशच नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *