मायबाप सरकार आम्हाला शिक्षण सोडावे लागणार का? एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

ST employee daughter write letter to chief minister

देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे एसटी सेवेवर परिणाम झाला असून कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन मिळत नाही आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. ही परिस्थिती पाहून एका एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

आम्ही दोन बहिणी आहोत. आमचे शिक्षण बाकी आहे. आता कोरोनाच्या अशा परिस्थितीत आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का? असा सवाल औरंगाबादेतील एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्र्यांना सामाजिक माध्यमावरून केला आहे. नंदिनी सुरवसे असे या मुलीचे नाव आहे. तिचे वडील के. एन. सुरवसे हे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. नंदिनी ही इयत्ता 12 विज्ञान शाखेत शिकत आहे. कोरोनामुळे मार्चपासून एसटीची सेवा कोलमडली आहे. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हीच परिस्थिती नंदिनी हिनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. आमची घरची परिस्थिती बिकट आहे. गावाकडे शेतही नाही. एसटी कर्मचारी आणि कुटुंबीय मरणाच्या दारात उभे आहे. त्यांना फक्त मायबाप सरकार वाचवू शकते. राज्य परिवहन ही सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. तरीही शासन एसटीला शासनात का विलीन करत नाही. एसटी कर्मचाऱ्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का? असा प्रश्न नंदिनीने उपस्थित केला आहे.

काही कर्मचारी भाजी विकत आहे. कोणी गवंडी काम करत आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार अत्यल्प आहे. त्यातच कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना कमीत कमी १० ते २५ हजार रुपये लागतात, असे तिने पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *