….. तर तिथेच राजीनामा दिला असता. : उदयनराजे

नुकताच राज्यसभा सदस्यांचा शपथविधी झाला. यामध्ये राज्यसभा खासदारकी शपथ घेतल्यानंतर उदयराजे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली. यावरुन राजकारण सुरु झाल आहे.

यावर आता दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही,” अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते उदयनराजे यांनी दिली.

काय आहे प्रकरण ?

राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली. “तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ असं व्यंकय्या नायडू म्हणाले.

जय भवानी जय शिवाजी या घोषणेवरुन झालेल्या वादावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपचं तोंडबंद आंदोलन सुरु झाल्याचं संजय राऊत म्हणाले होते. “”छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही…जय भवानी! जय शिवाजी!,” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *