शेतकर्‍यांना लवकरच सातबारावर पिकाची नोंद स्वत:च करता येणार

शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाची आणि चांगली बातमी आहे. आता शेतकर्‍यांना मोबाइलच्या सहाय्याने ‘ई पीक पाहणी’ करता येणार आहे. त्यामुळे पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या ७/१२ वर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंदी असणे आवश्यक असते. सद्य:स्थितीत गाव नमुना १२ वर तलाठ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची नोंद केली जाते. आता शेतकरीच आपल्या पिकाची नोंद करु शकणार आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने ‘ई पीक पाहणी’ हे मोबाईलवरील ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या ॲपचा वापर करून शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद सात बारावर करु शकणार आहेत.

विध विभागांकडून अनेक योजना व कामांमध्ये अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात पारदर्शकता व गती निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार शासनाने पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

कसे वापराल ॲप ? 

शासनाने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले असून ते सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल वर प्ले स्टोअरमधून सहज घेता येणे शक्य आहे. या ॲपमध्ये सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत.

या ॲपच्या माध्यमातून स्वतः शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकणार आहेत, शिवाय पिकाचा फोटो काढून तो ॲपवर अपलोड करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पिकाची नोंद करताच ही माहिती तलाठी यांच्या लॉग इन वर उपलब्ध होणार आहे, त्याला तलाठी यांनी मान्यता देताच त्या नोंदीचा अंमल शेतकऱ्यांच्या ७/१२ वर तात्काळ होणार आहे, ई पीक पाहणी ॲपवरून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद केल्यास अचूक व गतीने माहिती संकलित होण्यास मदत होणार आहे. या माहितीचा उपयोग आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री करणे, पीक कर्ज, पीक विमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे, न्यायालयीन प्रकरणे यामध्ये होणार आहे.

तलाठ्यांकडे जावे लागणार नाही

तलाठ्यांकडील वाढत जाणारा कामाचा बोजा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक एखादे महत्त्वाचे काम करावे लागणे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदी घेणे यामध्ये विलंब लागू शकतो. त्यामुळे पीक नोंदीच्या आधारावर जी कामे शेतकऱ्यांना करावयाची असतात त्यामध्ये शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने या प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *