पुणे पुन्हा ‘लॉकडाउन’, अजित पवारांची घोषणा.

वाढता कोरोनाचा आकडा पाहता पुन्हा एकदा संपूर्ण पुणे जिल्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलैपासून पुढचे १५ दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता.  “कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला  होता.

“कोरोनाचा रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा”, अशा सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने ९ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सचूना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *