५ ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या ताडोबातील केटी १ वाघाचा मृत्यू.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला काही दिवसांपूर्वीच जेरबंद करण्यात आले होते. या वाघाने ३ महिन्यात ५ लोकांचा बळी घेतला होता. कोलारा गावाजवळच्या जुना कोलारा गेट परिसरातून या वाघाला पकडण्यात आलं होत. अत्यंत धडधाकट समजल्या जाणार्‍या या वाघाला पकडून काही दिवसांपूर्वीच गोरेवाडा येथे आणले गेले होते आणि त्याला क्वारंटाइन करून ठेवले गेले. मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाड्यात आणल्यापासून या वाघाच्या खाण्यावर परिणाम झाला होता. बंदिस्त वातावरणात जुळवून घेणे त्याला कठीण गेले. सुरुवातीचे सलग तीन दिवस काहीही न खाता खाल्ल्यावर त्याने खाणे सुरू केले होते. गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे तज्ज्ञ या वाघावर उपचार करीत होते. या वाघाची प्रकृती अत्यंत चांगली होती आणि आजारपणाची कोणतीही लक्षणे त्याच्यामध्ये नव्हती. परंतु सोमवारी सकाळी प्राणी बचाव केंद्राचे कर्मचारी या वाघाच्या पिंजर्‍याजवळ गेले असता हा वाघ मृतावस्थेत आढळला.

पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी गोरेवाडा येथील रुग्णालयात या वाघाचे शवविच्छेदन केले. गोरेवाडा परिसरात या वाघाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर पशुवैद्यकीय कॉलेजच्या डॉ. माधुरी हेडाऊ, डॉ. मयूर पावशे, डॉ. के. सुजिथ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे हेमंत कामडी, मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते, डॉ. शिरीष उपाध्ये, गोरेवाडा येथील विभागीय व्यवस्थापक नंदकुमार काळे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दुखापतीमुळे या वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज गोरेवाडा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *