वीजबिलात ५० टक्के सूट द्या, मनसेच्या शिष्टमंडळाची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

राज्यातील वीज ग्राहकांना भरघोस बिल पाठविल्याने राज्यातील जनतेचा वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडाळाने आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्र्यांना वीज बील कमी करण्याबाबत पत्र दिलं. यावेळी ऊर्जामंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली. नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या बैठकीत मनसेने ऊर्जा मंत्र्यांकडे चार प्रमुख मागण्या मागितल्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिलं असल्याचं अभ्यंकर यांनी सांगितलं. ऊर्जा मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील हेदेखील उपस्थित होते.

“ऊर्जामंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, फक्त करेक्शन नाही, तर करेक्शननंतरही तफावत आढळली तर तेही बघू. पण आम्ही करेक्शन केलेल्या बिलमध्ये कमीत कमी 50 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे. कारण लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुंटुंबाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहेत. नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना कारावा लागत आहे. त्यामुळे याकडे माणुसकीच्या नात्याने बघितलं पाहिजे”, असं आवाहन अभ्यंकर यांनी केलं. “जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्याची गरज नाही. मनसेने यापूर्वीच सिद्ध केलंय की ते काय करतात. ती वेळ येऊ नये अशी अपेक्षा”, असंदेखील अविनाश अभ्यंकर यावेळी म्हणाले.

मनसेच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

1) ग्राहकांना सुधारित वीज बिलात 50 टक्के सवलत देण्यात यावी. तसेच लॉकडाऊन काळात केलेली दरवाढ रद्द करुन पूर्वीचेच दर आकारा.
2) ग्राहकांना बिलं भरण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
3) कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडीत करु नका.
4)ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *