राम भारतीय नाही तर नेपाळी, खरी अयोध्या नेपाळमध्ये, नेपाळच्या पंतप्रधानांचा अजब दावा

नेपाळमध्ये सध्या सत्ता संघर्ष चालू असून नेपाळच्या पंतप्रधानांनी आता आपली सत्ता वाचविण्यासाठी राम स्मरण केलं आहे. केपी शर्मा ओली यांनी अजब दावा केला आहे. खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच भगवान राम भारतीय नाही तर नेपाळी आहेत, असं केपी शर्मा ओली यांनी म्हटलं आहे.

सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या तयार केली असल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू श्रीराम भारतीय नाही तर नेपाळी असल्याचं ते म्हणाले आहेत. यापूर्वी ओली यांनी, भारत त्यांना सत्तेवरुन दूर करण्यासाठी कट रचत असल्याचंही म्हटलं होतं.

ओली यांच्या या वक्तव्याचा नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे नेते आणि माजी उप पंतप्रधान कमल थापा यांनी निषेध केला असून त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, कोणत्याही पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीचं असं निआधार आणि पुरावे नसलेलं वक्तव्य करणे योग्य नाही. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना भारत आणि नेपाळचे संबंध खराब करायचे असल्याचे यातून दिसून येत आहे. असं न करता त्यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं कमल थापा यांनी म्हटलं.

भारतविरोधी कामकाज आणि वक्तव्य यामुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये ओली यांच्याबाबत असंतोष आहे. भारतविरोधी कामकाज करण्यासाठी चीनचा छुपा पाठिंबा असल्याचंही बोललं जात आहे.  त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली जात आहे. तसेच नेपाळमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यातही केपी शर्मा ओली यांचं सरकार फेल झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *