राज्यसभेच्या उमेदवारीवरुन शिवसेना नेते नाराज . चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली खंत.

राज्यसभेच्या जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होत असून, पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देणार याविषयी पक्षात उत्सुकता होती. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे औरंगाबाद राखण्यासाठी खैरेंना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती. शिवाय औरंगाबाद पालिका निवडणुका आणि ‘एमआयएम’च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खैरेंना शिवसेना राज्यसभेत पाठवेल या शक्यतेला बळ मिळाले होते. मात्र पक्षाने खैरे यांच्यासोबतच रावते यांचाही पत्ता कापला आहे.
काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने गुरुवारी राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. मात्र या निर्णयाविरोधात पक्षातूनच नाराजीचा सूर आळवला जात आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते यांसारख्या ज्येष्ठ व निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आल्याने सेनेतील पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, तर दुसरीकडे युवासेनेतील तरुण पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.चतुर्वेदी यांचे हिंदी आणि इंग्रजीवर प्रभूत्व असल्याने त्या दिल्लीत सेनेची भूमिका प्रभावीपणे मांडू शकतात. त्यानिमित्ताने शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण करता येईल, या हेतूने पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याले बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे दिल्लीतील वर्चस्व कमी करण्यासाठी चतुर्वेदी यांना संधी देण्यात आल्याचीही दबक्या आवाजात पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

‘चतुर्वेदींचे काम दिसले, आमचे नाही’

प्रियंका चतुर्वेदी चांगले काम करत आहेत. हिंदी बोलतात, इंग्रजीही बोलतात. मी 20 वर्षे लोकसभा गाजवली. मला आवश्यकता नव्हती. पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मला अनेक ऑफर होत्या, पण इकडे-तिकडे गेलो नाही.” संधी मिळाली असती, तर पक्षासाठी आणखी चांगले काम करता आले असते. मात्र, स्मशानात जाईपर्यंत मी शिवसेनेत असणार आहे. मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले. आता उद्धव ठाकरेंसोबत काम करतो आहे. असे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *