राजस्थानमध्ये आज राजकीय भूकंप होण्याची शक्यता ?

राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सत्ताधारी काँग्रेसने रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेसने व्हीप जारी केला. तर दिल्लीवारीवर असलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्याने संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हं आहेत.

सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यात अपयशी ठरल्यामुळे सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. माझ्याकडे ३० आमदाराचं समर्थन असून राजस्थानचे अशोक गहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचे काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले. कोणत्या ३० आमदारांचे समर्थन आहे, हे मात्र समजू शकले नाही. दुसरीकडे काँग्रेस सूत्रांनी रविवारी रात्री अशोक गहलोत यांच्या बैठकीत ९० आमदारांची उपस्थिती असल्याचा दावा केला आहे.

मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्या कार्यालयात फोन करून त्यांच्याशी संवाद साधल्याचा दावा केला आहे. तसेच ते म्हणाले की, लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. सचिन पायलट यांच्या समर्थकांनी काँग्रेस नेता अहमद पटेल यांची भेट घेतली. सचिन पायलट यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी ३० मिनिटे संवाद साधला असे विविध वृत्त मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *