मोठी बातमी ! देशातील पहिली कोरोना लस तयार जुलैमध्ये होणार मानवी चाचणी

देशात कोरोनाचे रुग्ण ५ लाखांवर गेले आहेत. यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अशा स्थितीत एक चांगली बातमी आहे. भारतात कोरोनावरील लस तयार झाली आहे. भारत बायोटेकने ही लस बनवली आहे. यातील आनंदाची बाब म्हणजे या लसीच्या मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय ) दिली आहे.

भारत बायोटेक ही हैदराबादमधील फार्मा कंपनी आहे. या कंपनीने करोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. कोरोनावरील ही लस फेज-१ आणि फेज-२ या मानवी चाचणीसाठी डीसीजीआयने परवानगी दिली आहे. मानवी चाचणीचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिलीय. भारत बायोटेक कंपनीचा लस बनवण्याचा दीर्घ अनुभव आहे. पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर आतापर्यंत कंपनीने लस बनवल्या आहेत. कोरोना व्हायरसशी संबंधित SARS-CoV-2 स्ट्रेन पुण्यातील नॅशलन इन्सिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)मध्ये वेगळं केलं गेलंय. यानंतर हा स्ट्रेन भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात आला. भारत बायोटेकने तयार केलेली लस ही कोरोनावरील देशातील पहिली लस आहे. हैदराबादमधील जिनोम व्हॅलीत अति सुरक्षित लॅबमध्ये बीएसएल-३ (बायोसेफ्टी लेव्हल ३ ) ही लस बनवण्यात आली आहे.

देशात तयार केलेली ही पहिली लस आहे. ही लस बनवण्यात आयसीएमआर आणि एनआयव्हीने मोठी भूमिका बजावली आहे. तर डीसीजीआयने मानवी चाचणीची मंजुरी देऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिसर्च अँड डेव्हलप टीमच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. आम्ही हे काम सार्थक करू शकलो, असं भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *