महाराष्ट्राला आपल्या पायावर उभे करण्यासाठी भूमिपुत्रांना समोर येण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परराज्यातील मजूर वर्ग आपल्या राज्यात परत गेले आहे. त्यामुळे आता ग्रीन झोन मधील तरुणांना कामासाठी समोर येण्याचे आवाहन मुखमंत्र्यांनी केले आहे. राज्यात सध्या चौथे लॉकडाउन चालू असून या लॉकडाउन दरम्यान ग्रीन झोन मधील उद्योग चालू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी राज्यातील तरुणांनी स्वत: आत्मविश्वासाने पुढे यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 

 • आपल्याला हे जून महिन्यापूर्वी संपवायचं आहे, कारण नंतर शाळा कॉलेज सुरु होणार, अॅडमिशन करायचे आहेत, हे सर्व गरजेचे आहे. हे संकट आपल्याला परतवून लावायचं आहे, जनजीवन आपण पूर्वपदावर आणायचं आहे, पण हे सुरळीत होण्यास वेळ लागेल, आपण जेवढी खबरदारी घेऊ तेवढं लवकर आपण या बंधनातून मुक्त होऊ. 
 • ग्रीन झोनमध्ये आपण दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी दिली, यापुढे खबरदारी घेऊन ही दुकानं बंद करावी लागू नयेत, म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. जी शिस्त पाळली ती अजून जास्त हवी आहे, कडक पाळली पाहिजे, धार्मिक सण उत्सव साजरे करण्यास परवानगी नाही. 
 • घरात राहा सुरक्षित राहा हे आतापर्यंत पाळलं, यापुढे घराबाहेरही सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला रुमाल, मास्क लावा, हात वारंवार चेहऱ्यावर फिरवू नका, हे आपल्याला पुढील काही महिने पाळावं लागेल. 
 • परदेशातूनही लोक आपण आणत आहोत, मात्र विलगीकरण हे आवश्यक आहे, तुम्हाला काही लक्षण नसली तरी तुम्ही वाहक होऊ नका. 
 • तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडूनही विचारणा होत आहे, बाहेरच्यांना पाठवलं आम्हाला कधी पाठवणार? पण तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही पोहोचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका. 
 • मजूरांकडून तिकीट घेतलेले नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च केला आहे. मुंबईत राहणारी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील लोकांनाही घरी पाठवणार, पण अस्वस्थ होऊ नका. 
 • लॉकडाऊन जर उठवला तर इटली, ब्राझीलमध्ये जे काही होतंय ते इथे होईल, त्यामुळे लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊदे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन, रेड झोनमध्ये तूर्तास सूट नाही. 
 • राज्यभर आरोग्य सुविधा वाढवत आहोत, शक्य ती सर्व पावलं उचलत आहोत. 
 • आज मुंबईत आज १९ हजार रुग्ण पॉझिटिव्ह आहे, त्यातील ५ हजार रुग्ण बरे झाले आहेत, दुर्देवाने काहींचा मृत्यू झाला. याचा अर्थ वेळेत आलात तर बरे होता येते. 
 • मला अजूनही कोविड योद्धा हवे आहेत, पोलीस थकतात, आजारी पडतात, गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दोन पोलीस शहीद झालेत. 
 • मुंबईत ठिकठिकाणी बीकेसी, गोरेगाव, वरळी, रेसकोर्ट, मुलुंड, ठाणे अशा ठिकाणी केवळ कोव्हिड सेंटर नसेल तर जम्बो फॅसिलिटीचा प्रयत्न करु, सर्वांना व्हेंटिलेटरची गरज नाही पण ऑक्सिजन लागतो, त्याची व्यवस्था करतोय. 
 • महाराष्ट्रात ४० हजार एकर पेक्षा जास्त जमीन उद्योगांसाठी राखीव, जे लोक नवीन ग्रीन उद्योग सुरु करु इच्छित असतील, जे कोणतेही प्रदूषण करणार नाही, त्यांना कोणत्याही अटी नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *