महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला, राज्य सरकारचा निर्णय.

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर देशात तिसरे लॉकडाऊन असून आज या लॉकडाऊन शेवटचा दिवस होता त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला आहे.  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज 17 मे रोजी संपत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याची घोषणा आधीच केली आहे. त्यासंदर्भात केंद्र आज गाईडलाईन्स देखील जारी करणार आहे. राज्य सरकारने मात्र लॉकडाऊनबाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशात 31 मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आलीय. आपत्कालीन व्यवस्थान कायदा 2005 आणि साथरोग नियंत्रण कायदा 1897 नुसार राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन अजॉय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  कोविड 19 चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊनची स्थिती वाढवणं गरजेचं असल्याचंही अजॉय मेहता यांनी या आदेशात म्हटलंय. आधीच्या लॉकडाऊनमध्ये कोविड 19 चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स आता 31 मे 2020 पर्यंत लागू राहणार आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 30 हजारांच्या वर गेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा आज 54 वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे. केंद्राच्या गाईडलाईन्स आल्यावरच चौथा लॉकडाऊन कसा असेल याबाबत सविस्तर माहिती कळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *