भयावह..! कोरोनाच्या संशयावरून युवतीला बसबाहेर फेकले.

कोरोना चे लक्षण असल्याचा संशय आल्याने एका युवतीला चक्क चालत्या बसमधून बाहेर फेकण्याची घटना घडली. बसमधून बाहेर फेकल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांमध्ये या युवतीचा मृत्यू झाला. अंशिका यादव असे या युवतीचे नाव आहे. अंशिका आपल्या आईसोबत बसने प्रवास करत होती. अंशिकामध्ये करोनाची लक्षणे आहेत असे बसमध्ये बसलेल्या इतर प्रवाशांना वाटत होते. त्यानंतर या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टरने अंशिकाला खेचत नेत यमुना एक्स्प्रेस वेवर फेकून दिले.

दिल्लीच्या महिला आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. या युवतीचे कुटुंब दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील शिकोहाबादहून दिल्लीला आले होते. या प्रकरणाची तिच्या कुटुंबीयांनी प्रथम मथुरा पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, तेथे या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली नाही. उलट तेथे हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याची नोंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.

पीडित मुलीच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे मथुराचे वरीष्ठ पोलिस अधीक्षक गौरव ग्रोवर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास आपण ग्रामीणचे पोलिस अधिक्षक श्रीष चंद्रा यांच्याकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. या युवतीचा भाऊ विपिन यादव दिल्लीत काम करतो. ड्रायव्हर आणि कंडक्टरने माझ्या बहिणीवर ब्लँकेट फेकण्यात आले, कारण त्यांना तिला स्पर्श करायचा नव्हता. यानंतर ते तिला तिच्या सीटवरून खेचत आणले. त्या दिवशी उष्णता अधिक होती. या मुळे तिला त्रास होत होता. माझ्या आईने खूप विनंती केली, मात्र कुणीच तिचे ऐकले नाही. माझी बहीण अजिबात आजारी नव्हती. काही दिवसांपूर्वी तिच्या किडनीमध्ये खडे झाले होते, तो आजार बरा झाला होता, अशी माहिती तिच्या भावाने दिली.

या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी अंशिकाच्या कुटुंबीयांनी केली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवान यांनी मथुरा पोलिस अधीक्षकांना नोटीस धाडून या प्रकरणाची विस्तृत माहिती मागवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *