पबजी गेमसाठी मुलाने उडविले चक्क १६ लाख रुपये

नवीन पिढीला मोबाइलचे व्यसन जडले असून त्यासाठी सध्या ते वाट्टेल ते करण्यास तयार असतात. सध्या मोबाइल गेमिंग मध्ये पबजी गेमची प्रचंड क्रेझ चालू असून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पबजी गेम खेळण्याचे वेड लागले आहे. यामुळेच पंजाबमधील एका १७वर्षीय मुलाने पब्जीसाठी आपल्या आई-वडिलांच्या खात्यातील तब्बल १६ लाख रुपये खर्च केले. आपल्या खेळण्याच्या व्यसनामुळे त्याने आपल्या आई वडिलांनी केलेली संपूर्ण बचत वाया घातली आहे .

या मुलाकडे तीन बँक खात्यांची माहिती होती, त्याचा वापर तो पब्जी मोबाईल अकाऊंट अपग्रेड करण्यासाठी करत असेल. एवढंच नाही तर आपल्या मित्रांसाठीही अॅप विकत घ्यायचा आणि अपग्रेड करायचा. आई-वडिलांना बँक व्यवहाराची माहिती मिळल्यानंतर दिवट्याचा पराक्रम उघड झाला.या मुलाचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. “मी हे पैसे वैद्यकीय गरज आणि मुलाच्या भविष्यासाठी बचत केले होते,” असं वडिलांनी सांगितलं. “लॉकडाऊनदरम्यान मी माझ्या कामाच्या ठिकाणीच राहत होता तर माझी पत्नी आणि मुलगा घरात राहायचे. मुलगा त्याच्या आईच्या मोबाईलमधूनच सर्व व्यवहार करत असे. तसंच बँकेचे सर्व मेसेज डिलीट करत असे,” अशी माहिती मुलाच्या वडिलांनी दिली.

आपला मुलगा ऑनलाईन अभ्यासासाठी स्मार्टफोनचा जास्त वापर करत असल्याचा आई-वडिलांचा गोड गैरसमज होता. परंतु मुलाने गेमसाठी चक्क १६ लाख रुपये वाया घालवल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. “मी त्याला घरात रिकामा बसू देणार नाही, इतकंच काय तर त्याला अभ्यासासाठीही मोबाईल फोन देणार नाही,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया वडिलांनी दिली. मोबाईलवर पब्जी गेम खेळू नये यासाठी त्याला स्कूटर रिपेअरिंग शॉपमध्ये काम करण्यास ठेवलं आहे, जेणेकरुन पैसे कमावणं किती कठीण आहे हे त्याला कळू शकेल,” असंही ते म्हणाले.

तुमचे पाल्य देखील याप्रकारचे गेम खेळत असेल तर त्यांना वेळीच फटकारणे महत्वाचे आहे. अन्यथा त्याचे ऑनलाइन गेमिंग खेळण्याचे व्यसन वाढल्यास याचा वाईट परिणाम आपल्या व आपल्या पाल्यांच्या जीवनावर होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *