चंद्रपूरात सापडलेल्या वाघाच्या बछ्ड्याचीही झाली कोरोना चाचणी.

कोरोनाचा संसर्ग केवळ मानवालाच नाही तर प्राण्यांना देखील होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच आता खबरदारी म्हणून चंद्रपुर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथे काही दिवसांपूर्वी आढळलेल्या वाघाच्या बछड्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. एखाद्या वाघाची कोरोना चाचणी घेण्यात आल्याची भारतातील ही पहिलीच घटना असावी.

चंद्रपूर वनविभागाच्या अंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील मौजा सुशी (दाबगाव) येथे 24 एप्रिल रोजी अंदाजे 3-4 महिन्याचे वाघाचे (मादी) बछडे आढळून आले होते. या घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक यांच्यासोबत घटनास्थळी पोहचले. यानंतर चिचपल्ली परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी, स्थानिक एनजीओ, रॅपिड रिस्पॉन्स युनिट यांच्या मदतीने या बछड्याला पकडून सुरक्षितरित्या पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रान्जिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे हलवण्यात आले. बछड्यावर पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. क्षेत्रीय कर्मचारी वाघिणीचा शोध घेत आहेत. सद्यस्थितीत कोरोनाची साथ सुरु असल्याने वाघाच्या बछड्याचे कोविड-19 चाचणीसाठी स्वॅब नमुने गोळा करुन पशुवैद्यकिय महाविद्यालय, नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. क्षेत्रीय कर्मचारी वाघणीचा शोध घेत असून यासाठी जंगल परिसरात कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *