गृहमंत्र्यांकडून केलेल्या पोलिसांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून ४ दिवसांत रद्द

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ जुलैला मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र ४ दिवसातच मुख्यमंत्र्यांनी या बदल्या रद्द केल्या आहेत. यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय. बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केलं होतं. मात्र अवघ्या ४ दिवसात या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. बदल्या रद्द करताना या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या पूर्वीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे रविवार असूनही या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेत.

शासकीय सेवेतील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. मात्र आयपीएस म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस दलात संभ्रमाचं वातावरण आहे. अशातच ४ दिवसात बदल्यांचे आदेश रद्द केल्याने सरकारप्रमाणे पोलीस दलातही गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी रद्द केले. यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता या बदल्या केल्या होत्या का? गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी बदल्या रद्द केल्या का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हा दणका दिल्याचं मानलं जातंय.  सरकारमधील हा गोंधळ समोर आल्यानंतर सहाजिकच विरोधक टीका करण्याची संधी सोडणार नाहीत.

मोठी बातमी ! तीन महिन्यात कोरोनाची लस येणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *