कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन.

खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करु नये, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रसंगात असंवेदनशीलता दाखवू नका, असंही टोपे म्हणाले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

कोरोंना बरा होण्याचे आशादायी संकेत. 

राज्यात सध्या 135 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 4228 जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापैकी 4017 चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 19 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोना आजार बरा होतोय हे आशादायी चित्र आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

रक्ताचा तुटवडा, रक्तदान करावं

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसंचय आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये, हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करुन रक्तदान शिबिरं घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टन्सिंग पाळावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार

दरम्यान, सरकार लवकरच अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र देत आहोत. त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी या सगळ्यांचा समावेश असेल. तसंच शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर, कर्मचारी वर्ग तसेच अन्य आपात्कालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *